नवी दिल्ली येथे निवासी आयुक्त रुपिंदरसिंग यांच्या हस्ते ‘लोकसभा पूर्वपीठिका -२०२४’ चे प्रकाशन
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील वर्ष १९७७ ते २०१९ दरम्यानच्या महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश
नवी दिल्ली, : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने तयार करण्यात आलेली महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचे प्रकाशन, महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त रुपिंदरसिंग यांच्या हस्ते आज करण्यात आले.
निवासी आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पूर्वपीठिकेचे प्रकाशन झाले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यावेळी उपस्थित होते.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वपीठिकेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संदर्भ उपलब्ध झाले आहेत. ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारी आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त करताना निवासी आयुक्त रुपिंदरसिंग म्हणाले की, माध्यम प्रतिनिधी तसेच निवडणुकीशी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना ही पुस्तिका तात्काळ संदर्भासाठी उपयुक्त ठरणार आहे. ही संदर्भ पुस्तिका अल्पावधीत व परिपूर्ण माहितीसह सुबक पद्धतीने तयार केल्याबद्दल त्यांनी महासंचालनालयाचे कौतुक केले.
राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेपासूनच राष्ट्रीय प्रसारमाध्यमे आणि दिल्लीस्थित महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना लोकसभा मतदारसंघांविषयी साद्यंत माहिती देणारी पूर्वपीठिका प्रकाशित करण्यात येते. यावर्षीही 18व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वपीठिका प्रकाशित करण्यात आली आहे. माध्यम प्रतिनिधी व लोकसभा निवडणुकीतील विविध अधिकाऱ्यांना ही पुस्तिका संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी पडेल.
लोकसभा निवडणूक पूर्वपीठिकेत वर्ष 1977 पासून 2019 पर्यंत राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल, मतदारसंघनिहाय विजेते आणि उपविजेते ठरलेल्या उमेदवारांच्या मतांची माहिती व टक्केवारी देण्यात आली आहे. तसेच 1977 पासून राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे मतदारसंघनिहाय नावेही देण्यात आली आहेत. याखेरीज मुख्य राज्य निवडणूक अधिकारी, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस निरीक्षक व सर्व जिल्हा माहिती अधिकारी यांचे दूरध्वनी व फॅक्स क्रमांकांची माहिती देण्यात आली आहे. पूर्वपीठिकेतील या एकत्र माहितीचा प्रसार माध्यमातील प्रतिनिधींना महाराष्ट्रात पाच टप्प्यात होऊ घातलेल्या निवडणुकांचे वार्तांकन करताना मोलाची मदत होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ या संकेतस्थळाच्या स्कॅनकोडचा समावेश करण्यात आला आहे, ज्याद्वारे स्कॅनकोडचा उपयोग करून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे प्रकाशित करण्यात येणारी अद्ययावत माहिती पाहता येणे सहज शक्य होणार आहे.
यासोबतच निवडणूक आयोगाकडून निर्गमित महत्त्वाच्या एप्स, पूर्वपीठिका 2024 मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रम, लोकसभा मतदारसंघातर्गत विधानसभा मतदार संघ, मतदार व मतदान केंद्रांबाबत माहिती, देशभरात होणाऱ्या निवडणुकीचा सात टप्प्यांचा नकाशा, राज्यात होणाऱ्या निवडणुकीचा पाच टप्प्यांचा नकाशा, वर्ष 2024 मधील मतदारांची एकूण लोकसंख्येची माहिती देण्यात आली आहे. तसेच, केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक आचारसंहिता, मार्गदर्शक तत्वे, राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचारसंहिता, वृत्तपत्रांसाठी पेड न्युज, सोशल मीडिया, निवडणूक विषयक नियमांतील ठळक बाबी आणि निवडणूक आयोगाने खास निवडणुकीसाठी तयार केलेल्या ‘चुनाव का पर्व’ या चिन्हांचा समावेश आहे.