मुंबई, दि. १८ : देशभरातील रंगभूमीची समृद्ध परंपरा व विविध राज्यांमधील रंगभूमी कलाकारांचे योगदान यावर आधारित गिरीजा शंकर यांचे ‘रंग मंच’ हे पुस्तक रंगभूमीवर येणाऱ्या भावी पिढ्यांकरिता संदर्भ ग्रंथ ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व रंगभूमीचे अभ्यासक गिरीजा शंकर लिखित ‘रंग मंच’ या पुस्तकाचे सोमवारी (दि. १८) राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
रंगभूमीवर काम करणे आव्हानात्मक आहे. रंगभूमी करणाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तरी देखील देशातील लाखो लोक रंगभूमीची सेवा करतात. रंगभूमी केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक जागृतीचे माध्यम असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
शाळांमध्ये मुलांना नाटकांमध्ये भाग घेण्यास पालक व शिक्षकांनी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यातून मुलांचा आत्मविश्वास वाढेल, नेतृत्वगुण विकसित होतील व ते चांगले नागरिक होतील असे राज्यपालांनी सांगितले.
नाट्यगृहांचे भाडे परवडणारे असावे जेणेकरून नाटकांची तिकिटे कमी ठेवता येईल असे सांगून प्रादेशिक तसेच बोलीभाषेतील रंगभूमीला देखील प्रोत्साहन दिले गेले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
गिरीजा शंकर हे संवेदनशील लेखक आहेत. त्यांच्या पुस्तकाची समीक्षा होऊ शकत नाही. देशातील रंगभूमी समजून घ्यायची असेल तर गिरीजा शंकर यांचे पुस्तक वाचावे तसेच त्यांचे अनुभव ऐकावे असे राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक वामन केंद्रे यांनी यावेळी सांगितले.
रंगमंच हे पुस्तक देशभरातील रंगकर्मींचा लेखाजोखा असल्याचे अभिनेते व दिग्दर्शक ओम कटारे यांनी सांगितले.
लाखो लोक देशाच्या कानाकोपऱ्यात रंगभूमी करीत आहेत, ही एक प्रकारची अनामिक क्रांती असल्याचे गिरीजा शंकर यांनी सांगितले.
देशातील रंगभूमी व रंगभूमी कलाकारांबाबत ‘नया इंडिया’ या वृत्तपत्रात गिरीजा शंकर यांनी लिहिलेल्या स्तंभांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.
प्रकाशन सोहळ्याला कला दिग्दर्शक जयंत देशमुख, अखिलेन्द्र मिश्रा, दुर्गा जसराज आदी उपस्थित होते.