मुंबई, दि. १४ : राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्याकरिता व स्त्री भ्रूण हत्या रोखण्याकरिता राज्यात तक्रार नोंदविण्यासाठी ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ सुरु करण्यात येत आहे. या संकेतस्थळामुळे राज्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ (पीसीपीएनडीटी आणि एम.टी.पी) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मदत होणार आहे.
हे संकेतस्थळमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात येत आहे.
पीसीपीएनडीटी आणि एमटीपी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता विविध उपक्रम आणि उपाययोजना यशस्वीपणे राबविण्यासाठी विविध योजनांची कार्यवाही करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात तक्रार नोंदविण्यासाठी तसेच याविषयी कुठल्याही शंकेचे निरसन करण्यासाठी http://amchimulgimaha.in/ हे नवीन संकेतस्थळ सुरु करण्यात येत आहे.
या संकेतस्थळावर कोणीही तक्रार नोंदविल्यास ती तक्रार गोपनीय राहील व तक्रार देणाऱ्यास त्याची इच्छा असल्यास ते नाव देखील नोंदवू शकतील. पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत तक्रार निपटारा होऊन गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तक्रारीची अंमलबजावणी होऊन जर स्त्री भ्रूण हत्या रोखण्यास यश आले, तर तक्रारदारास शासनामार्फत खबरी बक्षीस योजनेअंतर्गत रक्कम रुपये १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. नागरिकांनी आरोग्य विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या संकेतस्थळाचा लाभ घेऊन समाजातील जन्म लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यास सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.