मुंबई, दि. १३ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विकसित केलेल्या अद्ययावत संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधील लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT – Direct Benefit Transfer) करण्याकरिता https://sas.mahait.org/ हे संकेतस्थळ विकसित केलेले आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे १५,९७,११६ तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे २९,६२,०१५ असे एकूण ४५,५९,१३१ इतके लाभार्थी आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. या संकेतस्थळाद्वारे संबंधित लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण आधार संलग्न बँक खात्यात लवकरच करण्यात येणार आहे.