दिमाखदार बौद्ध भिक्खु विपश्यना केंद्र लोकार्पण सोहळा संपन्न
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
गौतम बुद्धाची शिकवण आत्मसात करून समाजात रुजविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत : मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दिनांक 3 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे. गौतम बुद्धांची शिकवण आणि प्रेरक विचार आत्मसात करून समाजात रुजविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी
पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज केले.
येवला येथील मुक्तीभूमीवरील १५ कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या दिमाखदार बौद्ध भिक्खु विपश्यना केंद्र व विविध विकास कामांचे लोकार्पण भिक्खू वाटसनपॉन्ग मेडिटेशन सेंटरचे संचालक फ्रा ख्रुसुतमतावाचाई मठी आणि बुद्ध इंटरनॅशनल वेलफेअर मिशन तसेच इंटरनॅशनल बुद्धीस्ट मॉक ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक सचिव भिक्खू बी.आर्यपल व मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, जिल्हा परिषदेच्या माजी
अध्यक्षा मायावती पगारे, भिक्खू सुगत, भिक्खू संघरत्न यांच्यासह धम्म बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील याच ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली. त्यावेळी सुमारे १० हजार लोक येथे धर्मांतर घोषणेवेळी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकालातील
तीन भूमी महत्वाच्या आहेत. जेथे धर्मांतराची घोषणा केली ती मुक्तीभूमी, जेथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ती नागपूरची दीक्षाभूमी व जेथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले ती चैत्यभूमी आहे. करूणा, सत्य व अहिंसा या तत्वावर आधारित बौद्ध धर्माचा स्वीकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला. बौद्ध धर्माचा इतिहास पाहता सम्राट अशोकाने या धर्माचा प्रचार केला. आपल्या मुलांनाही बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेत पाठविले. बुद्धगया येथील महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण त्यावेळी सम्राट अशोकाच्या मुलीने श्रीलंकेत केले आहे. त्याच बोधीवृक्षांच्या फांदीचे रोपण नाशिक येथील त्रिरश्मी लेणी येथे करण्यात आले आहे.
मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले, आजचा दिवस हा खूप महत्वाचा व आनंदाचा आहे. या मुक्तीभूमीवर यापूर्वी पहिल्या टप्प्यात सुमारे १५ कोटी रुपये निधीतून भगवान गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विश्वभूषण
स्तूप व विपश्यना हॉल इ. निर्माण करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने ब वर्ग तीर्थक्षेत्र स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. मुक्तीभूमी टप्पा २ अंतर्गत सुमारे १५ कोटी रुपये निधी खर्च करून विविध विकास कामे करण्यात आली आहे. यामध्ये पाली व संस्कृत अभ्यास केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, ऑडीओ व्हिज्युअल रूम, आर्ट गॅलरी, अॅम्पीथिएटर, मिटिंग हॉल, भिक्खू पाठशाला, १२ भिक्खू विपश्यना खोली, कर्मचारी निवासस्थान, डायनिंग हॉल, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते व लॅण्डस्केपिंग या कामांचा समावेश आहे. नागरिकांनी या वास्तूंचे संवर्धन करावे, येथे स्वच्छता राखावी तसेच केव्हाही येथे भेट देवून बौद्ध भिक्खु यांच्याकडून विपश्यना संदर्भात ज्ञान प्राप्त करावे व ध्यान करावे जेणेकरून दैनंदिन जीवनातील
ताणतणाव यापासून मानसिक शांती मिळण्यास मदत होईल, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित धम्मबांधव व नागरिक यांना संबोधित केले.
यावेळी भिक्खू आर्यपाल म्हणाले की, सम्राट अशोकाने गौतम बुद्धांचे विचार जगभरात पोहचविण्यासाठी, ते रुजविण्यासाठी महत्वपूर्ण काम केले. आज मंत्री छगन भुजबळ हे देखील भगवान बुद्धांचा शांतीचा मार्ग देशभरात पोहोचवित आहत. वाईट वागू नका,
विचार करू नका, वाईट काम करू नका व मन स्वच्छ ठेवा या बुद्धांच्या शिकवणीचा प्रत्येकाने अंगीकार करून प्रचार करावा असे भिक्खू आर्यपाल यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरानी मुक्तीभूमी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस अभिवादन करून बौद्ध वंदना घेतली. त्यानंतर मुक्तीभूमीच्या परिसराची पाहणी केली. तद्नंतर उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य, दिमाखदार बौद्ध भिक्खु विपश्यना केंद्राचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यानी इमारतीच्या आतील कार्यालयाची पाहणी केली.
प्रास्ताविक विलास पाटील यांनी तर आभार भिक्खू सुगत थेरो यांनी मानले.
यावेळी लोकशाहीर शितल साठे व सचिन माळी यांनी भगवान गौतम बुध्द व भीम गीतांचे सादरीकरण केले.