मुंबई, दि. 1 : भारत व बांगलादेशातील नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य, मैत्रीपूर्ण संबंध तसेच सहकार्याची भावना वाढविण्याच्या दृष्टिने केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून भारतभेटीवर आलेल्या बांगलादेशातील 100 युवा प्रतिनिधींनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. आंतरराष्ट्रीय युवा आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत या भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.
बांगलादेशच्या मुक्ती लढ्यापासून भारताचे बांगलादेशशी मैत्रीपूर्ण संबंध असून हे संबंध काळाच्या कसोटीवर टिकून आहेत. भारत व बांगलादेश दोघेही युवा राष्ट्र म्हणून उदयास आले असून अलिकडल्या काळात भारताप्रमाणे बांगलादेशने देखील उल्लेखनीय प्रगती केली आहे. बांगलादेश व महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी – आदानप्रदान, अध्यापक आदानप्रदान व सांस्कृतिक सहकार्य वाढल्यास त्याचा उभय देशांना फायदाच होईल असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी उपस्थित बांगलादेशचे युवा प्रतिनिधी संदीप कुमार घोष व रिफत आरा रिफा यांनी भारत भेटीमुळे आपली भारताविषयी समज अधिक व्यापक झाली असल्याचे सांगितले. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवन, आग्रा येथील ताज महाल, मुंबईतील टाटा कर्करोग हॉस्पिटल, गेटवे ऑफ इंडिया, चित्रनगरी, वास्तू संग्रहालय आदी पाहून आनंद झाल्याचे त्यांनी आपल्या अनुभव कथनात सांगितले.
ढाका येथील भारतीय उच्चायोगातील राजनितीक अधिकारी राजीव जैन, युवा मंत्रालयातील अधिकारी आगम मित्तल, नौशाद आलम व सागर मंडल, बांगलादेश युवा शिष्टमंडळाचे नेते संदीप कुमार घोष व रिफत आरा रिफा तसेच प्रतिनिधिमंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.