पुणे, दि. ६ : विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमावर शासनाचा भर आहे, तसेच महिला आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण बनविण्याचे काम सुरू असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले.
भूगाव येथील फ्यूएल बिझनेस स्कूलच्या वार्षिक संमेलन व भविष्यवेधी कौशल्य चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी फ्यूएलचे संस्थापकीय अध्यक्ष केतन देशपांडे, मुख्य मार्गदर्शक संतोष हुरलीकोप्पी, मनोज पोचाट यांच्यासह विविध कंपन्यांचे सामाजिक दायित्व निधी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
अलिकडच्या काळात शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल झाले आहेत असे सांगून मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, दहा पंधरा वर्षापूर्वी पदवी मिळविणे, किंवा त्यापूर्वीच्या पिढीत दहावी- बारावी उत्तीर्ण होणे ही मोठी बाब होती. आज केवळ पदवी, पदव्युत्तर पदवी मिळविणे एवढेच नव्हे तर उज्ज्वल भवितव्य देऊ शकेल असे अभ्यासक्रम, प्रशिक्षण निवडणे गरजेचे ठरले आहे. त्यासाठी कौशल्य विकासाचे आणि व्यावसायिक अभ्यासक्रम पूरक ठरू शकतात. त्यामुळे फ्युएल बिझनेस स्कूलने असे अभ्यासक्रम समाजाच्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे.
त्या पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेण्यास अडचण निर्माण होत असते. फ्यूएल बिझनेस स्कूल विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे अत्याधुनिक कौशल्यांचे दर्जेदार शिक्षण देत असून ही संस्था आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थांना शिष्यवृत्ती देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. संस्थेने पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही विद्यार्थ्यांच्या हिताच्यादृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन करावे. संस्थेने शासनाच्या कौशल्य विकास, नाविन्यता विभागासोबत सामंजस्य करार केले असल्यास त्यांना शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल.
शासन आणि शिक्षण संस्थांनी एकत्र काम केल्यास निश्चितच चांगले यश प्राप्त होईल, असे सांगून फ्यूएल बिझनेस स्कूलच्या पुढील वाटचालीस आणि विद्यार्थ्यांच्या उज्जवल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
श्री. देशपांडे यांनी फ्यूएल स्कूलच्या कार्याची माहिती दिली. यावेळी मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ‘५० प्लस इन्सपायरेशन स्टोरीज ऑफ फ्यूएल’ या पुस्तकाचे व फ्यूएल युनिव्हर्सिटीच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.