नाशिक, दि. २ (जिमाका): पावसाने खंड दिल्यामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सप्टेबर पावसाचा शेवटचा महिना असून या महिन्यातही पाऊस न पडल्यास पुढे भीषण टंचाईचा समाना सर्वांना करावा लागणार आहे. त्याअनुषंगाने नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे धरणे अथवा पाणीसाठ्यांवरून अनधिकृत पाणी उपसा होणार नाही यासाठी कठोर कारवाई करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
येवला येथील संपर्क कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस दिलीप खैरे, वसंत पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, निफाड प्रांताधिकारी हेमांगी पाटील, येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, गटविकास अधिकारी महेश पाटील, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, तहसीलदार शरद घोरपडे, तहसीलदार आबा महाजन, उपविभागीय जलसंधारण अधिकारी जी एम शेख, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निफाड के.डी. गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एच.बी. जोगळे, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, हेमंत दशपुत्रे, उपअभियंता प्रकाश घोडे, उपअभियंता गणेश चौधरी, उपविभागीय अभियंता अभिजित शेलार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, दुष्काळाच्या परिस्थितीमुळे पाण्याचा काटकसरीने वापर करणे व त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी चारा लागवड करावी, जेणेकरून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल. धरण परिसरात अनधिकृत पाणी उपसा टाळण्यासाठी या परिसरातील विज पुरवठा खंडीत करण्यात यावा. महावितरणने शेतीला पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने तालुक्यातील नादुरूस्त वीज ट्रॉन्सफॉर्मर त्वरीत दुरूस्त करावेत.
१६ गाव पाणी पुरवठा योजनेंतर्गत सोलर प्लॅन्ट संदर्भातील कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच विंचूरसह, लासलगाव व इतर गावांना पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने वीजपुरवठा खंडीत होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात यावी. येवला शहारात साकरण्यात येणाऱ्या शिवसृष्टी स्मारकाची कामे सुरू करण्यात येवून मुक्तीभूमी स्माकाराची उर्वरित कामे १३ ऑक्टोपर्यंत पूर्ण करावीत तसेच मुक्तीभूमीचा परिसरही सुशोभित करण्याच्या सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या.
व्यापारी संकुलातील विद्युतीकरणाची कामे त्वरीत करावीत. तसेच आपला दवाखाना सुरू करण्यासाठी नियोजित जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी. पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणारी मॉडेल व्हिलेज योजना, महिलांसाठी रोजगार योजना सुरू करण्याच्यादृष्टीने कार्यवाही करावी. पाण्याची टंचाई असल्यामुळे गणपती विसर्जनावेळी मोठ्या मुर्ती विसर्जित करता येणे शक्य नसल्यामुळे मुर्तीदान करण्याबाबत जनजागृती करावी त्याचप्रमाणे शहरात उत्सव काळात स्वच्छता राहील यादृष्टीने योग्य दक्षता घेण्यात यावी. तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था आबाधित राहील यादृष्टीने आवश्यक व काठोर कारवाई करण्याबाबतच्या सूचनाही मंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित यंत्रणांना दिल्या.