नाशिक: दिनांक २ मार्च २०२३:
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पंचवटी, नाशिक येथील अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष, अर्थशास्त्र विभाग व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रिसर्च मेथडॉलॉजी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, मनमाड येथील प्राचार्य डॉ. डी. डी. गव्हाणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी
त्यांचे शुभहस्ते अर्थशास्त्र मंडळाचे उद्घाटन पार पडले. प्राचार्य डॉ. गव्हाणे यांनी दर्जेदार संशोधन कार्य होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने वाचन, चिंतन आणि मनन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी अर्थशास्त्रात गुणात्मक संशोधन कार्य केल्यास विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात असेही आपल्या मनोगतातून सांगितले. संशोधन समस्येची निवड कशी करावी? योग्य संशोधन पद्धतीचा वापर कसा करावा? प्रातिनिधिक स्वरूपाचा नमुना कसा निवडावा? पूर्व संशोधन साहित्याचा आढावा कसा घ्यावा? इत्यादी बद्दल त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. प्राचार्य डॉ. गव्हाणे यांनी त्यांच्या स्वतःच्या पीएच. डी. च्या प्रबांधाच्या महत्वाच्या स्लाईडस् विद्यार्थ्याना दाखविल्या.
कार्यशाळेच्या दुसऱ्या तांत्रिक सत्रात लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एन. एन. गाढे यांनी संशोधनाच्या पायऱ्या, संशोधनाची उद्दिष्टे, संशोधनाची गृहीतकृत्ये, संशोधनाची व्याप्ती, मर्यादा, कालखंड, प्रकरणांची मांडणी, संदर्भ साहित्याची मांडणी इत्यादी बद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. त्याचप्रमाणे संशोधन प्रकल्पाचे लेखन कसे करावे? दर्जेदार शोध निबंध कसा लिहावा? प्लागरिझम कसे टाळावे? याविषयी प्रा. गाढे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी आजच्या काळात संशोधनाचे महत्त्व खूप वाढले असून अर्थशास्त्र विषयात संशोधन केल्यास रोजगाराच्या संधी मिळू शकतात असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी संशोधन करण्याची गरज असून समाजातील विविध प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे प्राचार्य गव्हाणे सर आणि प्रा. एन. एन. गाढे यांनी दिली.
राणी गुंजाळ, रोशन डंबाळे, राठोड, निलेश देशमुख, कविता मोरे, धीरज वड, चेतन गांगोडे व इतर विद्यार्थ्यांनी कार्यशाळेविषयी मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एच. कापडणीस, उपप्राचार्य तथा अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे समन्वयक डॉ. विनीत रकीबे,, पर्यवेक्षक डॉ. संतोष चोबे, डॉ. सतीष तांबे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. ना. ना. गाढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. सुजाता आहेर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. रुपाली देवरे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. आशा पाटील यांनी आभार व्यक्त केले. प्रा. पूनम ब्राह्मणकर यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी सहकार्य केले. कार्यशाळेत अर्थशास्त्र विभागातील पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.