मुंबई: “जी भाषा जात-पात विसरून सर्वांना सामावून घेते तीच विश्वाची भाषा होते. हे सर्व गुण मराठी भाषेत आहेत. या भाषेचा वापर अधिकाधिक करून मराठी भाषा समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी आवर्जून मराठी बोलले, लिहिले पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात ‘मराठी भाषा दिनानिमित्त’ महाराष्ट्र विधानमंडळ आयोजित ‘साहित्याची ज्ञानयात्रा’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठी भाषा ही प्राचीन आणि समृद्ध आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर, कवी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, डॉ.भालचंद्र नेमाडे असे ज्ञानपीठ विजेत्यांचे मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी योगदान आहे. याचबरोबर विजय तेंडुलकर, जयंत पवार ते अगदी आताचे प्रणव सखदेव, प्रवीण बांदेकर असे वास्तवाला भिडणारे अनेक लेखक मराठीत आहेत. या मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शब्दांची देवाणघेवाण झाली पाहिजे. अशा देवाणघेवाणीमुळे भाषा प्रवाही व जिवंत राहते. महाराष्ट्राला गौरवशाली साहित्य आणि संस्कृतीची परंपरा लाभली आहे. आपले साहित्य एक अमूल्य ठेवा आहे. राज्य शासनाने अलिकडेच शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजा बढे यांनी लिहिलेल्या “जय जय महाराष्ट्र माझा” या गीताला राज्य गीताचा दर्जा दिला आहे. साहित्य, मराठी भाषा आणि राज्याचा अभिमान यांना एकत्र आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मराठी भाषा ही २५०० वर्षांपूर्वीची आहे. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देता येणार आहे. साहित्य संमेलनासाठी साहित्यिकांच्या समस्या शासन सोडवेल आणि मदत करेल. मराठी भाषा भवनाचे काम लवकरच गतीने पूर्ण करू, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,
मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठी माणसाने नेहमी जगाचा विचार केला आणि त्यामुळेच संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वाला पसायदान दिले. मराठी भाषेने आजवर अनेक आव्हाने पेलली आहेत. कुसुमाग्रज यांच्या शब्दांतून खऱ्या अर्थाने शिव म्हणजे सर्व विश्व आहे हा विचार मांडला आहे. मराठी ही प्राचीन भाषा आहे. शेकडो वर्षांपासून अनेकांनी ही भाषा समृद्ध केली आहे.
जगातील अनेक भाषा संपल्या पण मराठी संपणे शक्य नही. मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाईल मराठी भाषेचा व्यवहारात वापर झाला पाहिजे, ती ज्ञान भाषा झाली पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणात उच्च व वैद्यकीय शिक्षण मराठीत घेता येणार असून उच्च शिक्षणात गेल्यानंतर भाषेशी तुटणारे नाते जोडण्याचा प्रयत्न होत आहे. जगात सर्वात चांगले इंजिनिअर जर्मनीत आहेत, ते तेथील मातृभाषेत शिक्षण घेत असल्यामुळे हे घडत आहे. आम्हीच वर्षानुवर्षे इंग्रजीचा आग्रह धरून ठेवला. आता केंद्र सरकारनेही नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देण्याचा निर्णय स्वीकारला आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
मराठी भाषेची गौरव पताका जगभरात फडकतेय – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्यिकांसाठी अपूर्व अशी मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या प्रेरणादायी साहित्यांमुळे मराठी भाषेची गौरव पताका जगात फडकत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बहुभाषिक, बहुसांस्कृतिक असणारे महाराष्ट्रासारखे राज्य जगात नाही. आपल्या राज्यातील भाषेचा विकास करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. तसेच मराठी भाषेचा इतिहास, देशातील भाषा, मराठी भाषेचे वैशिष्ट्ये अशी सविस्तर माहिती त्यांनी यावेळी सांगितली.
मराठी भाषेसाठी सर्वजण एकत्र येतात – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ‘साहित्याची ज्ञानयात्रा’ हा कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि उपस्थित मान्यवरांनी मनापासून दिलेली दाद आणि वेळ देखील खूप महत्त्वाचा आहे. मराठी भाषेचा प्रश्न असो अथवा मराठी भाषेच्या विकासासाठी सर्वजण एकत्र येतात. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून २७ फेब्रुवारी २००२ मध्ये दोन्ही सभागृहात ठराव मांडला. इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आज समाजमाध्यमे आणि मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे देखील मराठीचा चांगला वापर करतात. नव्याने होणाऱ्या मराठी भाषा भवनमध्ये येणारी सर्व कार्यालये एकत्र असावीत. जेणेकरून एकाच ठिकाणी मराठी विषय सर्वांना अभ्यास करणे सोपे होईल, असे ही त्या म्हणाल्या.
नवीन मराठी भाषा भवन अभ्यासाचे केंद्र बनेल : मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर
मराठी भाषा मंत्री श्री. केसरकर म्हणाले, मराठी भाषेचा मराठी माणसाला अभिमान आहे.मराठीला आपण आई मानतो. त्या मराठीचा आज गौरवाचा दिवस आहे. शालेय शिक्षण विभाग व मराठी भाषा भवनचा भूखंड एकत्रित करून मरिन लाईन्स येथे आदर्शवत, सुसज्ज वास्तू उभारणार आहे. यामध्ये संमेलन, चर्चासत्र, संशोधन केले जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मराठी विश्वकोश ही एक देणगी आहे. मराठी विश्वकोशाचे कार्यालय भाड्याच्या जागेत होते. यावर्षी नवीन प्रस्ताव तयार केला असून वाई येथे सुसज्ज इमारत उभारणार आहे. परदेशात शनिवारी व रविवारी मराठी भाषा शाळा चालवतात. मराठी भाषा टिकावी यासाठी प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आमदार यामिनी जाधव यांनी यावेळी स्व-रचित जीवनविषयक कविता सादर केली. अभिनेते डॉ. गिरीश ओक व लीना भागवत यांनी अभिवाचन केले. गायक नचिकेत देसाई, धनश्री देशपांडे, अभिषेक नलावडे यांनी मराठी भाषेचे महत्त्व असलेल्या गीतांचे गायन केले. या कार्यक्रमांची संहिता उत्तरा मोने यांची होती. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित या कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली. अनुश्री फडणीस यांनी सूत्रसंचालन केले. विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान साचिव राजेंद्र भागवत यांनी आभार मानले.