नाशिकः मविप्र समाजाचे समाजकार्य महाविद्यालय संचलित चाईल्डलाईनच्या वतीने सामाजिक संस्था आणि समाज कार्यकर्ते यांच्यासाठी “काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली बालके आणि सामाजिक संस्था व समाजकार्यकर्त्याची भुमिका” या विषयावर मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर, मविप्र समाजाचे संचालक अॅड. लक्ष्मण लांडगे उपस्थित होते. बाल न्याय मंडळच्या सदस्य शोभा पवार या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. बाल संरक्षणातील जोखीम, संवेदनशीलता, समाजकार्यकर्त्याची भूमिका, सजगता आणि जबाबदारी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. यावेळी बाल कल्याण समितीचे सदस्य डॉ. (अॅड.) भगवान येलमामे, एन.जी.ओ फोरमचे अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, म.वि.प्र समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, प्राचार्य डॉ. विलास देशमुख, आय.एम.आर. टी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत सूर्यवंशी आणि चाईल्डलाईनचे संचालक महेंद्र विंचूरकर व्यासपीठावर उपस्थित होते. गेल्या काही वर्षात मुलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते.
दिवसेंदिवस मुलांवर होणारे शोषण, अत्याचार याचे प्रमाण वाढत चालले आहे. एक असुरक्षित वातावरण मुलांसाठी निर्माण झालेलं आपण पाहतोय. बाल मजुरी, बाल विवाह, विधीसंघर्षग्रस्त मुलांचे प्रमाण वाढताना दिसत आहे, पालक आणि मुलांमध्ये सातत्याने एक तणाव निर्माण होताना दिसतोय, मुलांवर होणारे शारीरिक शोषण, लैंगिक शोषण चे प्रमाण वाढताना दिसून येतंय, छेडछाड, व्यसनाधीनता सारख् समस्या दिसून येतात, तसेच मुलांसोबत ची क्रूर वागणूक म्हणजे मुलांना मारहाण करणे, टोचून बोलणे, मुलांना लाज वाटेल असे वागणे, मुलांशी भेदभाव करणे, इत्यादी प्रकार सातत्याने वाढताना दिसून येत आहेत. याशिवाय वस्त्यांमध्ये मुलांसाठी सुरक्षित मोकळ्या जागा नाहीत, मैदाने नाहीत अशाप्रकारचे अनेक समस्या मुलांच्या बाबतीत आपल्याला आढळून येतात. हे जर आपल्याला रोखायचे असेल, यावर प्रतिबंध लावायचा असेल तर मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अगदी सूक्ष्म स्तरावर जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे आणि आजच्या घडीला या समस्यांबाबत विचार करणारी, मुलांच्या प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करणारी आणि त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच मुलांशी संवाद साधण्यासाठी, त्यांना मदतीची आवश्यकता असल्यास ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी, मुलांच्या अधिकारांना घेऊन जनजागृती करणारी, मुलांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी, कायदेशीर प्रक्रिया राबवण्यासाठी तसेच कायदेशीर केस दाखल करण्यासाठी पालकांना / शिक्षकांना मदत करण्यासाठी आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या प्रत्येक मुलाला सहाय्य करण्यासाठी सामाजिक संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे.
बालकांच्या संरक्षणासाठी सामाजिक संस्थांचा सहभाग महत्वाचा आहे तसेच काळजी व संरक्षणाच्या बालकांना तात्काळ मदत मिळणे गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळी शोभा पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चाइल्डलाईन शहर समन्वयक प्रणिता तपकिरे यांनी केले प्रिया शिंदे यांनी आभार मानले. कल्याणी अहिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिता लिलके, विकी घोडे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर चर्चासत्रामुळे समाजकार्यकर्त्याना आणि विद्यार्थ्यांना बाल संरक्षण काळाची गरज विषयावर माहिती मिळाली तसेच भविष्यात ह्या क्षेत्रात काम करण्यासाठीची दिशा व मार्गदर्शन मिळाले.
Related Stories
June 17, 2024
June 17, 2024
June 17, 2024